LokSabha Elections 2024: धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शंभरहून अधिक हिस्ट्री सीटर्सना पोलिसांनी दिली शपथ.
LokSabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची गुन्हेगारांना शपथ दिली. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हेगारांची ओळख परेड राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे आयुक्तालयात गुन्हेगारांची ओळख परत घेण्यात आल्यानंतर आज पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील ही ओळख परेड घेण्यात आली. तीन वर्षांपासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी, जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी.
संशयित, गुन्हेगार, समाजकंटक, मागील तीन वर्षांतील आरोपींचे गटातील वैरभाव आणि पूर्वी ८० व आता १४८ झालेले हिस्ट्रिशीटर्स अशा सर्वांना वठणीवर आणण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. यावेळी धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सकाळपासूनच 100 हून अधिक हिस्ट्रीशिटर हजर होते. यावेळी या उपस्थित हिस्ट्रीशीटर्सना धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची शपथ दिली आहे. तसेच त्यांना कायदा सुव्यवस्था बिघडल्यास गाठ आमच्याशी राहील अशा प्रकारचा सज्जड इशारा देखील देण्यात आला.