मांजरम गावच्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्यात यावी.रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांची मागणी.
नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर
मांजरम येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केलेल्या निकृष्ट व अपूर्ण कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्री. इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सर्वात मोठे मांजरम हे गाव असून गावातील लोकसंख्या अंदाजे १० हजाराच्या वर आहे. भौगोलिक क्षेत्रफळ सुद्धा तालुक्यात मोठे आहे. लोकवस्ती ही जुनेगाव, नवी आबादी, मांजरम वाडी अशा भागामध्ये वसलेली आहे.
मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांजरम गावची पाणीपुरवठा ही योजना विशेषबाब म्हणून सन २०१८ या वर्षात मंजूर केली होती.
सदर पाणीपुरवठा योजना दोन टप्प्यात करण्याचे नियोजित होते, त्यानुसार सन २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात अंदाजे ०६ कोटी रुपयाचे आणि सन २०२१ या काळात दुसऱ्या टप्प्यात अंदाजे ०२ कोटी रुपयांचे काम सुरू झाले होते. आतापर्यंत सदर योजनेचे काम अत्यंत कासव गतीने, अत्यंत निकृष्ट आणि बोगसगिरी करत थातुर – मातुर काम चालू बंद आहे.
यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होण्याची दाट शक्यता आहे, ही योजना जर वेळेवर चांगल्या प्रकारे यशस्वी झाली असती तर गावकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असता. पण काम आतापर्यंत झालं नसल्यामुळे ही शक्यता मावळली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि आक्रोश पाहायला मिळत आहे.
या संपूर्ण कामाची कसून चौकशी करून संबंधित कंत्राटदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, बोगस काम करून शासनाचा वेळ व पैसा घालवल्याबद्दल सदर पैशाची व्याजासकट वसुली करावी आणि संबंधित कंत्राटदाला काळ्या यादी टाकावे. नव्याने कंत्राटदार नेमून ही योजना यशस्वी करावी अन्यथा सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्ही आपल्या दारामध्ये आंदोलन करू असा इशारा शिंदे यांनी दिला.
यावेळी मांजरम गावचे श्रीनिवास गोरडवार, जावेद शेख उपस्थित होते.