नायगाव पंचायत समितीच्या वादग्रस्त तांत्रिक सहायकाला जिल्हा परिषदेचे अभय.
*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नायगाव पंचायत समितीचे तांत्रिक सहायक एम.एम. शेख हे शेततळे, सिंचन विहीर व गायगोठे या कामासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अर्थिक लुट करत आहेत. दोन वेळा झालेल्या चौकशीत ते दोषी आढळले असून एका प्रकरणात त्यांना निलंबीत करण्याचा तर दुसऱ्या प्रकरणात सेवा समाप्ती करण्यात यावा असा अहवाल पंचायत समितीने पाठवला आहे.
मात्रया प्रकरणी कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने वादग्रस्त तांत्रिक सहायकाला जिल्हा परिषद अभय देत असल्याचे दिसून येत आहे.मागच्या दोन वर्षात रोजगार हमी योजनेची विविध कामे कागदावरच झाली आहेत या प्रकरणाला पंचायत समितीचे तांत्रिक सहायक एम.एम. शेख हे जबाबदार असून अनेक प्रकरणात त्यांनी चिरीमिरी घेवून बोगस कामे केली आहेत.दुसरीकडे
शेततळे, सिंचन विहीर व गायगोठ्याचे अंदाजपत्रक करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांला तीन हजार रुपये मागणी करत होते. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या फायली अडगळीत टाकून नंतर आलेले प्रस्तावाचे पैसे घेऊन अंदाजपत्रक तयार केल्याचे (ता.१६) सप्टेंबर २०२२ रोजीच्या पंचायत समितीच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे तांत्रिक सहायक यांनी हेतुपुरस्सर संबधीतांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवून कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होते.
त्यामुळेसंबधीतास निलंबीत करण्याची शिफारस करण्यात आली होती.दुसऱ्या प्रकरणात तालुक्यातील आलुवडगाव येथील शेतकरी विठ्ठलराव किशनराव इंगोले हे मयत झालेले असतांनाही रोजगार सेवक व ग्रामसेवकाच्या सहीने मस्टर मागणी करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक सहायक व रोजगार सेवकाने लाभार्थी मयत असतांनाही लाभार्थ्याविना ‘जिओ टँग’ केले.
दोघांनीहीलाभार्थी मयत असल्याची बाब लपवून ठेवली असल्याचे चौकशी उघड झाले. त्यामुळे चौकशी अहवालात तांत्रिक सहायकाला दोषी ठरवण्यात आले असून त्याची सेवा समाप्त करण्यात यावी अशी शिफारस (ता.७) नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्याकारी अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.
नायगाव पंचायत समितीने दोन वेळा चौकशी करुन वादग्रस्त तांत्रिक सहायक एम.एम. शेख यांच्या बद्दल गंभीर ठपका ठेवून अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवला पण जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीच्या अहवालाला केराची टोपली दाखवून या वादग्रस्त तांत्रिक सहायकाला पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
————–
जिल्हा परिषदेकडे दोन वेळा तांत्रिक सहायक एम.एम. शेख यांच्या बाबत पाठवलेल्या अहवालावरुन कारवाई व्हायला पाहिजे पण का झाली नाही माहिती नाही.
एल.आर. वाजे, गटविकास अधिकारी.