Ladkhed: उभ्या पिकात जनावरे सोडली.
Ladkhed: दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका शेतातील उभ्या पिकात जनावरे सोडण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तुकाराम परसराम राठोड यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला गावातीलच गुराखी सुनील रायसिंग राठोड याने जनावरे सोडल्याची तक्रार आहे.
तुकाराम राठोड यांच्या सात एकर शेतात कपाशीचे पीक उभे होते. त्या पिकामध्ये जनावरे सोडण्यात आली. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सात एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. यात जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी तक्रारीतून व्यक्त केला आहे. शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने राठोड शेती वाहून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात.
परंतु, आता शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत राठोड यांनी लाडखेड पोलिस स्टेशनला तक्रार दिली. मात्र, तीन दिवस लोटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांनी कारवाई करून न्याय द्यावा. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तुकाराम राठोड यांनी केली आहे.