एक दिवा शहीदांसाठी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचा पुढाकार.
उमरखेड प्रति : ज्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड तर्फे शहीद स्मारक येथे एक दिवा शहीदांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभूतपूर्व साहस, देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यावर मात करून आपल्या जीवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय शहीद वीर जवान यांना दिवा लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिवाळी उत्सव आपण घराघरात दिवे लावून हर्षोऊल्हासात साजरा करतो.दररोज देवांचे नामस्मरण करताना प्रत्येक भारतीयाने देशाच्या सिमेवर देशाचे रक्षण करणार्या सैनिकांचे सुध्दा स्मरण करावे अशी भावना माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विवेक मुडे यांनी व्यक्त केले.
सर्व सामान्य माणसांपासून गरीब-श्रीमंत आपापल्या परीने हा सण साजरा करतात परंतु आपल्या देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांनी त्यांच्या प्राणाची आहुती, बलिदान देऊन त्यांच्या स्वतःच्या घरचा दिवा विझवून देशासाठी सर्वस्व अर्पण केल्यामुळेच आपण दिवाळीच नव्हे तर सर्व सण, उत्सव आनंदात साजरे करू शकतो.
आपल्या आनंदात देशाच्या सीमेवरील शहीद झालेल्या लाखो जवानांच्या परिवाराचे दुःख सामिल आहे , ही भावना लक्षात घेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड च्या वतीने दरवर्षी एक दिवा शहीदांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.यावर्षीही दिवाळीच्या पावन पर्वावर हुतात्मा स्मारक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळ आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विवेक मुडे, माजी सैनिक लक्ष्मिकांत पिंपरखेडे, जेष्ठ नागरीक मनोहर धामनकर, पञे, हरडफकर, खंडाळे, वानखेडे, पांडे, डाॅ.देशमुख तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रभाकर दिघेवार,दीपक ठाकरे, गजानन रासकर, राजेश भोकरे,विजय नगरकर,प्रा.डाॅ.अनिल काळबांडे व ईतर नागरीक उपस्थित होते.