Judo Competition: दिग्रसच्या तीन ज्यूडो खेळाडूंना विद्यापीठाचा कलरकोट, अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र.
Judo Competition: दिग्रस येथील बी बी कला, ना भ वाणिज्य व बा पा विज्ञान महाविद्यालयाच्या तीन ज्यूडो खेळाडुंनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहुमान असलेल्या कलरकोटचे मानकरी ठरले आहे. या यशामुळे ते अखिल भारतीय स्पर्धेसाठी देखील पात्र ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आंतर महाविद्यालयीन ज्यूडो स्पर्धा दिनांक १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. दिग्रस येथील उपरोक्त महाविद्यालयाच्या तीन ज्यूडो खेळाडूंनी यात सहभाग नोदविला होता. त्यापैकी तिघांनीही विविध वजन गटात सुवर्णपदक पटकावून शहराला लौकिक मिळवून दिले .
ज्यूडो ४८ वजन गटात बी एस सी भाग-१ ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री रवी चव्हाण हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. बी एस सी भाग-१ चा विद्यार्थी सागर दिनेश जाधव ६० किलो वजन गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला , तर बी ए भाग-१ चा साबीर अक्रम चौहान ६६ किलो वजनगटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. दिग्रसच्या तिन्ही खेळाडुंना सदर कामगिरीबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मानाचा कलरकोट प्राप्त झाला असून त्यांची निवड विद्यापीठाच्या ज्यूडो संघात झाली आहे.
आणखी एक मानाचा तुरा म्हणजे तिन्ही खेळाडू अखिल भारतीय विद्यापीठ ज्यूडो स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास पात्र ठरले आहे. तिन्ही विजयी खेळाडुंनी यशाचे श्रेय आपले आई वडील व ज्यूडो प्रशिक्षक शिछत्रपतीं पुरस्कार विजेता डॉ. रविभूषन माणिकराव कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य आदींना दिले . दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.